५ हजार ४७६ कोटींच्या पॅकेजसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

५ हजार ४७६ कोटींच्या पॅकेजसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई / प्रतिनिधी
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदतीचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.

सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आदिवासी विभागाच्या १२ लाख लाभार्थ्यांना आगाऊ मदतीचे तात्काळ वितरण, बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगार, घरेलु कामगार, राज्यातील फेरीवाले, रिक्शाचालक यांच्यासह विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा निधी तात्काळ वितरित करावा. यासाठी आवश्यक शासन निर्णय, निधी वितरणाचे आदेश जारी झाले आहेत. उर्वरीत आदेशही तात्काळ जारी व्हावेत, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू करताना गरजू आणि गरीब घटकांसाठी मदत जाहीर केली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत या मदतीचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजनेतील तीस टक्के निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याअंतर्गत ३ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार १०० कोटी रुपयांचा निधीचे वितरणही झाले आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

राज्यातील १२ लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे १८० कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे. ही मदत देताना सायकल रिक्षाचालकांचाही विचार करण्यात आल्याचे अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या बैठकीत व्हिसीद्वारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,परिवहन मंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सहभागी झाले होते. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी बैठकीला उपस्थित होते.


निधी आणि मदत

# ९० कोटी : अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत देणार

# ७५ कोटी : राज्यभर दररोज दोन लाख शिवभोजन थाळ्या मोफत मिळणार

# ९६१ कोटी : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनेतील ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरीता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देणार

#१८० कोटी : १२ लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजारांप्रमाणे मदत

#७५ कोटी : पाच लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे मदत

#३७५ कोटी : राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मदत

# २४० कोटी: १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे अर्थसाहाय्य

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com