Friday, April 26, 2024
Homeराजकीयसमर्पित आयोगाचा विभागवार कार्यक्रम जाहीर

समर्पित आयोगाचा विभागवार कार्यक्रम जाहीर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण ( OBC Reservation In Local Body ) पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने गठीत केलेला ‘समर्पित आयोग’ राज्यभर दौरा करणार आहे. आयोगाच्या दौऱ्याला २१ मेपासून पुण्यातून सुरुवात होईल. या दौऱ्यात आयोग ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात नागरिकांची मते जाणून घेणार आहे.

- Advertisement -

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.

समर्पित आयोग २१ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे भेट देईल. २२ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद तर याच दिवशी सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे आयोग भेट देईल.

२५ मे २०२२ रोजी दुपारी २.३० ते दुपारी ४.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे तर २८ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती आणि याच दिवशी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे आयोगाचे सदस्य नागरिकांना भेटतील.

या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी. तसेच यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन समर्पित आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या