...तेव्हा तुम्हीही भुजबळांना चिडवले होतेच ना!

नितेश राणेंच्या ‘त्या’ कृतीवरून विधानसभेत गदारोळ
...तेव्हा तुम्हीही भुजबळांना चिडवले होतेच ना!

मुंबई | Mumbai

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी चिडवले या मुद्द्यावरून विधानसभेत पुन्हा गदारोळ झाला...

शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नितेश राणेंच्या कृत्यावर आक्षेप घेतला. नितेश राणे यांचे कायमचे निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना प्रत्युत्तर देत छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) अपमान केल्याची आठवण करुन दिली.

भास्कर जाधव म्हणाले की, या सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय तिसऱ्यांदा चर्चेला आला आहे. तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला आणि निलंबित करायला सांगितले होते. मी त्याबद्दल माफीदेखील मागितली होती.

मात्र आदित्य ठाकरे यांच्याबाबत विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी काही आवाज काढले. आ. सुनील प्रभू यांनी हा विषय मांडल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू नये असे त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते तरीदेखील नितेश राणे हे जुमानत नाही. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच ते होते. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सभागृहात अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याकडे पहायचेच नाही असा नवा पायंडा सुरु झाला आहे का? ठरवून निलंबन केले जात असल्याचे दिसत आहे. आम्हाला हरकत नाही, आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत, रडणारे नाही. नितेश राणे यांच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे.

कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही सदस्याने असे वागू नये सांगितले आहे. पण आता भास्कर जाधव तुम्ही विषय काढला आहे म्हणून निदर्शनास आणू देतो असे म्हणत याच सभागृहात भुजबळसाहेब तिकडे बसायचे आणि भास्कर जाधवांसहित आम्ही सगळे इकडे बसायचे तेव्हा हुप हुप करणाऱ्यांमध्ये भास्कर जाधवदेखील होते. हे या सभागृहाने पाहिले आहे, असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भास्कर जाधवांच्या त्या वागण्याचेदेखील समर्थन नाही. या सभागृहाबाहेर जे काही घडले त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. पण जर हे त्या गोष्टीचा फायदा घेत निलंबन करण्याच्या हेतूने आले असतील तर लोकशाहीमध्ये हे करणे योग्य नाही. अशा शब्दांत फडणवीसांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com