तळोदा व शहादा येथील नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

माजी आ.उदेसिंग पाडवी यांची माहिती
तळोदा व शहादा येथील नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

मोदलपाडा/सोमावल ता.तळोदा वार्ताहर NANDURBAR

येत्या काळात होणार्‍या शहादा व तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण नेतृत्व करावे, यासाठी दोन्ही पालिकेतील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. भाजपा व काँग्रेसचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. येत्या काही महिन्यात

राष्ट्रवादीकडून इतर पक्षांना राजकीय भूकंपाचे झटके दिले जातील, अशी माहिती माजी आ.उदेसिंग पाडवी यांनी देशदूतशी बोलतांना दिली. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

श्री.पाडवी यांनी सांगितले, दिवाळीनंतर साधारणतः एक महिन्यांनी एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून प्रवेशाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून त्या कार्यक्रमांतर्गत शहादा व तळोदा तालुक्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

भाजपाच्या सत्ताकाळात आमदार असलेले उदेसिंग पाडवी यांना दहा महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाकडून तिकीट घेत थेट माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्यासमोर निवडणूक लढवली.

या निवडणुकीत त्यांना नवा मतदार संघ असूनही पन्नास हजारावर मते मिळाली होती. तद्नंतर काँग्रेसमध्ये सुद्धा ते जास्त काळ रमले नाहीत व त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्या सांगण्यावरून त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

एकनाथराव खडसे यांच्या सांगण्यावरून आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी काही दिवसांपुर्वीच केला होता. त्यामुळे अख्या महाराष्ट्राला खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुद्दा त्यांनी गाजविला.

माजी आमदार पाडवी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व निर्माण तर झाले आहेच त्याचबरोबर तळोदा व शहादा तालुक्यात श्री.पाडवी यांच्या सक्रियतेने राष्ट्रवादीत नवसंजीवनी निर्माण होईल, यात शंका नाही.

एका वर्षात होऊ घातलेल्या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी राष्ट्रवादीकडून किंबहुना माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात पार पडेल, अशी आजची परिस्थिती आहे. या दृष्टीने शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होऊन सत्तारूढांना राष्ट्रवादीकडून राजकीय भूकंपांचे हादरे देण्यात येतील, असे त्यांनी सूतोवाच केले.

तसेच तळोदा नगरपालिकेची निवडणूक दोन वर्षावर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने या पालिकेतील काही नगरसेवक माझ्या संपर्कात असून पालिकेतील नगरसेवकच नाहीतर मोठे पदाधिकारी व भाजपातील बडे मासेदेखील गळाला लागतील असेही श्री.पाडवी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या बडया नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होता होता राहिला

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व निरीक्षक अर्जुनराव टिळे व अविनाश आदिक हे नंदुरबार जिह्याच्या दौर्‍यावर असतांना काँग्रेसमधील बडे नेत्यांनी त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासबंधीची इच्छा व्यक्त केली होती. शिवाय, मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी भेट घेऊन काँग्रेसच्या बड्या नेत्यांची राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत चर्चा झाली होती. परंतु काही मुद्यांवर एकमत न झाल्याने काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश होता होता राहिला. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाल्यास या मतदार संघाची जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात यावी अशी मागणी एका पत्राद्वारे श्री.पाडवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

येत्या काळात भाजपाला खिंडार

येत्या काही काळात तळोदा व शहादा तालुक्यात भाजपा पक्षामध्ये खिंडार पडेल असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. भाजपा पक्षात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. या नाराजीचा शेवट भाजपा पक्षात तर आरंभ राष्ट्रवादीत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com