करोना लसीकरण : राहुल गांधींसह प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

करोना लसीकरण : राहुल गांधींसह प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दिल्ली l Delhi

भारतात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळत असून एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ८२ हजारांवर पोहोचला आहे. तसेच देशात करोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान करोना लसीकरणावरून काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणावर राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधींनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमवणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार," अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

तसेच "केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात करोनाची भयंकर अशी दुसरी लाट आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतत आहेत. सर्वसामान्यांचं जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मात्र अहंकारी सरकारला चांगल्या सूचनांची अ‍ॅलर्जी आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'करोनाची दुसरी लाट येणार असल्याचं माहिती असतानाही सुविधा निर्माण करण्यात का आल्या नाहीत?' अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. तसेच, 'जर हे सरकार पाकिस्तानच्या आयएसआयसोबत चर्चा करु शकतं, तर हे सरकार विरोधी पक्षांशी चर्चा का करु शकत नाही?' असा प्रश्न काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्राला विचारला आहे.

तसेच, 'रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली. त्याचवेळी देशात तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिलं नाही? कारण तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. मॉरिशिअस, नेपाळला लस जात असल्याचं आम्ही टीव्हीवर पाहत होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच आज तुटवडा जाणवत आहे,' अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

'देशातील कोरोना महामारीची परिस्धिती पाहता, नरेेद्र मोदींनी प्रचारयात्रांमध्ये विनोद करणं सोडून लोकांमध्ये जात त्यांची परिस्थिती पाहावी. त्यांनी लोकांना सांगावं, की कशा पद्धतीने ते लोकांचा जीव वाचवणार आहेत.' असेही गांधी म्हणाल्या.

तसेच, 'गेल्या सहा महिन्यांमध्ये १० लाखांहून अधिक रेमडेसिवीर निर्यात केले आहेत, आणि आज देशात याचा तुटवडा जाणवतोय. तसेच जानेवारी ते मार्चमध्ये ६ कोटी लसी निर्यात केल्या, तर देशातील ४ कोटी लोकांचेच लसीकरण पार पडले. या सगळ्यात भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com