काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा ; राहुल गांधींच्या भेटीनंतर पटोलेंची मोठी घोषणा

काँग्रेसचा पुन्हा स्वबळाचा नारा ; राहुल गांधींच्या भेटीनंतर पटोलेंची मोठी घोषणा

नवी दिल्ली / New Delhi - काँग्रेस सतत स्वबळाचा नारा देत असल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बिघाडी झाल्याची सध्या चर्चा आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस स्वबळावरच निवडणुका लढवेल अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नाना पटोले आज दिल्लीत असून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राहुल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेनंतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. यापुढील काळात राज्यात पक्षवाढीसाठी काय केलं पाहिजे यासाठी बैठकीत चर्चा झाली. येणार्‍या काळात महाराष्ट्रात काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येईल त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचं नाना पटोले म्हणाले.

त्याचसोबत विधानसभा, लोकसभा निवडणुकीबाबत तीन वर्षानंतर हायकमांड निर्णय घेईल. पण पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com