काँग्रेस आमदारांच्या निधीतून देणार १११ रुग्णवाहिका

- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा‍
काँग्रेस आमदारांच्या निधीतून देणार १११ रुग्णवाहिका

मुंबई | प्रतिनिधी


कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस आमदारांच्या निधीतून १११ रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केली.

अ‍ॅ‍ॅम्ब्युलन्स च्या संदर्भात आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने आज विविध समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. त्यावेळी बोलताना पटोले यांनी वरील माहिती दिली.

राजीव गांधी हे दूरदृष्टीचे नेते होते. देशातील तरुणाईची ताकद जगाला दाखवून देण्याचा त्यांचा संकल्प होता. २० व्या शतकातच भारताला २१ व्या शतकाचे स्वप्न त्यांनी दाखवले आणि त्यादृष्टीने पाऊले उचलली. आजच्या डिजीटल भारताची पायाभरणी ही राजीव गांधी यांनी केली होती. या द्रष्ट्या नेत्यांवर विरोधी पक्षाने खोटे आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचे काम जाणीवपूर्वक केले. आधुनिक भारताची पायाभरणी करणारे राजीव गांधी हे देशासाठी जगले आणि देशासाठीच त्यांनी प्राणाचे बलिदान दिले, असे पटोले यांनी सांगितले.

राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रदेश काँग्रेसच्यावतीने चेंबूरच्या नालंदा हॉलमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष शाम पांडे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com