Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंच्या निशाण्यावर बॉलिवूड सेलिब्रेटी; दिला 'हा' इशारा

नाना पटोलेंच्या निशाण्यावर बॉलिवूड सेलिब्रेटी; दिला ‘हा’ इशारा

मुंबई l Mumbai

नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. इंधन दरवाढीच्या मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना इंधन दरवाढीवरुन आक्रमक भूमिका घेणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आता शांत का? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे. तर मोदी सरकारच्या देशाविषयी धोरणात या कलाकारांनी भूमिका न मांडल्यास महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. परंतु, मनमोहन सिंह सरकारच्या काळात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे ते आता शांत का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसंच मनमोहन सिंह सरकार काळात ज्या लोकशाही मार्गाने ट्विट करत होते. त्यापद्धतीने मोदी सरकार विरोधाताही भूमिका मांडावी अन्यथा त्यांचे सिनेमे महाराष्ट्रात चालू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी देखील महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद घेत मोदी सरकार व काही सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. ‘युपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारं सरकार होतं म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झालं, त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केलं नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

‘केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेचं जगणं कठीण झालं असून अत्याचाराचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये, तर डिझेल ८६ रुपये लिटर झालं आहे. त्यातच घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे. करोना संकटामुळे लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. नोकरदार, मध्यम वर्गीयांनाही जगणे कठीण झालं आहे, त्यात दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली आहे. मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.’ असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

नाना पटोलेंचे वक्तव्य प्रसिद्धीसाठी

नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा टोला, देवेंद्र फडणवीस यांचा नाना पटोलेंना लगावला.

तसेच भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं, ‘अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना काँग्रेसचे नेते धमकी देत आहेत. त्यांच्या सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नाही असं म्हणत आहेत. काय गुन्हा आहे अमिताभ बच्चन यांचा? देश हितासाठी त्यांनी ट्विट केलं हा गुन्हा होऊ शकतो का? परदेशातील काही लोक षडयंत्राद्वारे भारतला बदनाम करत आहेत आणि काँग्रेस त्यांच्या समर्थनार्थ उतरत आहेत.’

- Advertisment -

ताज्या बातम्या