
मुंबई | Mumbai
रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय. २ मे म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनामा नाट्याने सुरु झालेल्या या नाट्याचा शेवट अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीने झाला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
यासोबतच राजभवनात अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देखील पुन्हा स्विकारलं आहे. अजित पवार यांचे बंडामागे भाजपमधील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यानंतर आता अजित पवारांच्या या निर्णयावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ पोस्ट करत टोला लगावला आहे.
सचिन सावंत यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज पुन्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचं अधोरेखित केलं आहे. तसेच फडणवीसांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. सचिन सावंत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, 'राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपची युती होण शक्य नाही. नाही, नाही..नाही..नाही. आपत धर्म नाही, श्वासत धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एकवेळ सत्तेशिवाय राहू. मला कुणीतरी विचारल तुमचा विवाह होणार आहे का? मी सांगितलं अविवाहीत राहणं पसंत करेल पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही.'