राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ

राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातील त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती.

राजीव सातव यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी देशभरात पसरली. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या या तरुण आणि उमद्या नेत्याच्या निधानाने काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच इतरही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीव सातव श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार यांनी म्हंटल आहे की, 'जरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

तसेच काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती, असेही पवार यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'माझा मित्र राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्याने मला फार वाईट वाटलं. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारे नेते होते. हे आपल्या सर्वांचे एक मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या सदिच्छा.'

सातव यांच्या निधनाचं वृत्त कळताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 'राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे.. चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?', असं ट्विट राऊत यांनी केलं.

काँग्रेस नेते, नाना पटोले यांनी राजीव सातव यांच्या जाण्यानं आपलं नुकसान होण्यासोबतच काँग्रेस पक्षाचंही मोठं नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली. तसेच ट्विट करत म्हंटल आहे की, 'निशब्द.. आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त !'

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com