Friday, April 26, 2024
Homeराजकीयपंतप्रधान चीनला घाबरले, भारताची जमीन चीनला दिली; राहुल गांधींचा घणाघात

पंतप्रधान चीनला घाबरले, भारताची जमीन चीनला दिली; राहुल गांधींचा घणाघात

दिल्ली l Delhi

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पँगाँग त्सो सरोवर आणि लडाख यांच्या निवेदनावर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढविला आहे.

- Advertisement -

पंतप्रधानांनी देशाची जमीन चीनच्या ताब्यात दिली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला घाबरले, त्यांच्या भूमिकेचं समर्थन होऊ शकत नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाले, एप्रिल २०२० मध्ये जी परिस्थिती होती तशीच पूर्ववत व्हावी, यासाठी भारत सरकारकडून वाटाघाटी केली जाऊ शकली असती. परंतु, हे सरकार विसरलं. चीनसमोर नरेंद्र मोदींनी आपलं शीर झुकवलं, माथा टेकला. आपली जमीन फिंगर ४ पर्यंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्याड आहेत जे चीनसमोर उभे राहू शकले नाहीत. हेच सत्य आहे. ते सेनेच्या बलिदानावर थुंकत आहेत, हेच ते सांगत आहेत. त्यांनी सेनेच्या त्यागाचा अपमान केलाय. भारतात कुणालाही असं करण्याची परवानगी देता कामा नये’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.

तसेच, रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या देसपांग प्लेन्सच्या भागाबद्दल संरक्षण मंत्री एक शब्दही बोलले नाहीत. तिथे सुद्धा चीनने अतिक्रमण केले आहे. मोदींनी भारताची भूमी चीनला दिली आहे, त्याबद्दल त्यांनी देशाला उत्तर दिले पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, मागील काही महिन्यांमध्ये भारत-चीन सैन्यांमध्ये सीमाभागांत तणाव असल्याचं पहायला मिळालं आहे. हिंसक झडपी दरम्यान भारतीय सैनिक जखमी झाल्याचंदेखील बघायला मिळालं होतं. त्यावेळेस पंतप्रधानांनी स्वतः सीमेवरील सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. पूर्व लडाख सीमेवर मागील ९ महिन्यांच्या तणावाग्रस्त स्थिती होती. मात्र कालपासून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक रणगाडे आणि सैन्य देखील दोन्हीकडून हटवले जात आहे.

काय म्हणाले होते संरक्षणमंत्री?

भारत-चीन दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून सीमारेषेसंर्दभात (LAC) वाद सुरु आहे. गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबत महत्वाची घोषणा केली. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने काल जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी आज संसदेत लडाखमधील स्थिती संदर्भात माहिती दिली. राजनाथसिंह म्हणाले, “चीन बरोबर झालेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य माघारीचा निर्णय झाला आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल. काही प्रश्नांवर वाद सुरु आहे. परंतु ते ही चर्चेतून सुटतील” असे राजनाथ यांनी सांगितले. दोन्ही बाजू पद्धतशीरपणे फॉरवर्ड बेसवरुन माघार घेतील. मुत्सद्दी पातळीवर ठरल्यानंतर दोन्ही देश पुन्हा गस्त सुरु करतील असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

काहीच गमावले नाही

सीमावादात भारतील लष्कराने सर्व आव्हानांचा आक्रमक पद्धती सामना केला. या दोन्ही चर्चेत आपण काहीच गमावले नाही. सीमावादासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकवेळा भूमिका स्पष्ट केली आहे. आपली एक इंचही जमीन कोणाला घेऊ देणार नाही.

चीनचा दावा, LAC वरील वाद संपला

संरक्षण मंत्र्यांच्या राज्यसभेतील वक्तव्यापूर्वी बुधवारी चीनच्या सरकारने दावा केला होता की, लडाखमध्ये LAC वर भारतासोबत नऊ महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपला आहे. बुधवारी दोन्ही देशाकडून एकसोबतच माघार घेण्यास सुरुवात झाली आहे.

10 वी बैठक लवकरच होणार

चीनच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेंसचे प्रवक्ते वू कियानने सांगितला की, चीन आणि भारतादरम्यान झालेल्या कमांडर लेव्हलच्या 9 व्या बैठकीत डिसइंगेजमेंटवर एकमत झाले होते. या अंतर्गत दोन्ही देशाने पँगॉन्ग हुनान आणि नॉर्थ कोस्टवरुन आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या