स्मृतीदिनाच्या आडून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न; नाना पटोलेंची टीका

स्मृतीदिनाच्या आडून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न; नाना पटोलेंची टीका

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत-पाकिस्तान फाळणीचा दिवस हा स्मृती दिन (Partition Horrors Remembrance Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Cngress Nana Patole) यांनी जोरदार टीका केली आहे.

देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे त्याग, बलिदान व मोठ्या कष्टाने मिळालेले आहे. या स्वातंत्र्यासाठी मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. परंतु स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय जनता पक्ष (BJP) १४ ऑगस्ट हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करत आहेत हे दुर्दैवी असून देशाची पुन्हा फाळणी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न काँग्रेस (Congress) हाणून पाडेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. टिळक भवन (Tilak Bhavan) या काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) ते बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले की, भारताबरोबर जे देश स्वतंत्र झाले त्या देशात हुकुमशाही सत्ता सुरु झाली परंतु जगातील सर्वात मोठा व गौरवशाली लोकशाही देश म्हणून भारताचा जगात लौकीक आहे, भाजपा त्याला तिलांजली देऊ पाहत आहे. १४ ऑगस्ट हा फाळणीचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे. त्या रक्तरंजित दिवसाच्या स्मृतींना उजाळा देत नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष देश तोडण्याचे काम करत आहे. जातीय तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे. देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचण्याचे भाजपाचे (BJP) हे मनसुबे काँग्रेसचा कार्यकर्ता हाणून पाडेल.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सक्षम नेतृत्वाने केंद्र सरकारविरोधात (Modi Govt) आव्हान उभे केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विचाराचा विजय व्हावा यासाठी समर्पक भावनेने काम करा, काँग्रेस पक्ष पुन्हा भरारी घेईल आणि देशाची लोकशाही व्यवस्था व संविधान अबाधित ठेवू असेही पाटोले म्हणाले.

या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रा. प्रकाश सोनावणे, प्रमोद मोरे, राजाराम देशमुख, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com