दिल्ली l Delhi

काँग्रेस पक्षाचा आज (सोमवार, २८ डिसेंबर २०२०) स्थापना दिन आहे. हा पक्षाचा १३६वा स्थापना दिन आहे. पक्षासाठी महत्त्वाचा असलेला हा दिवस. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी पक्षाच्या स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येलाच परदेशात रवाना झाले आहेत. त्यांच्या या परदेश दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी परदेश दौऱ्यावर रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याबद्दल फारशी वाच्यता करण्यात आली नसली, तरी ते लवकरच भारतात परत असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनालाच राहुल गांधी अनुपस्थितीत असल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले,”राहुल गांधी हे वैयक्तिक छोट्या दौऱ्यावर असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं आहे. ते लवकरच भारतात परतणार आहेत,” अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची आजी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई इटलीतील मिलान शहरात राहतात. आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी मिलानला गेले आहेत. पण या वृत्ताला काँग्रेसने अधिकृत दुजोरा दिलेला नाही. राहुल गांधी मर्यादीत कालावधीसाठी परदेशी गेले आहेत आणि लवकरच ते परत येतील, असे काँग्रेस सूत्रांनी सांगितले. पण राहुल गांधी यांच्या परतीच्या दिवसाबाबत माहिती देणे टाळले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत, असे टि्वट करुन राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

मागील दोन विधानसभा निवडणुकीपासून गळीतगात्र झालेल्या काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वावरून दोन गट पडले आहेत. पुर्णवेळ अध्यक्षाच्या प्रतिक्षेत असलेली काँग्रेस १३६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राहुल गांधींनी नेतृत्व करण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कार्यशैलीबद्दल त्यांच्यावर मित्रपक्षांकडून टीकाटिप्पणी होत असतानाच या दौऱ्यामुळे ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. ऐन काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या मध्येच राहुल गांधी परदेशात गेल्यानं त्याची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर ते नवीन वर्ष साजरं करण्यासाठी परदेशात गेल्याचं बोललं जात आहे.