Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयकृषी कायद्याविरोधात कॉंग्रेस आक्रमक

कृषी कायद्याविरोधात कॉंग्रेस आक्रमक

दिल्ली l Delhi

नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरु आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आणि नवे कायदे मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढला जाणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला.

- Advertisement -

यामुळे काँग्रेस नेत्यांनी १० जनपथ येथे रस्त्यावरच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रियांका यांना ताब्यात घेतलं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना फरफटत व्हॅनमध्ये टाकलं. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तापले आहे.

कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिकेत ठिय्या आंदोलन करतेवेळी प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्या खासदारांबाबतीत पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आपण लोकशाही राष्ट्रात राहतो आणि ते (आंदोलनकर्ते) हे रितसरपणे निवडून आलेले खासदार आहेत. त्यांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ज्यासाठी त्यांना परवानगी मिळालीच पाहिजे. यासाठी हरकत का असावी? सध्याचं सरकार हे दिल्लीच्या सीमेवर असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचं म्हणणंच ऐकत नाहीय’, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी फक्त तीन नेत्यांना परवानगी दिली गेली आहे. अतिरिक्त पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. “काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तीन नेते राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात”. दरम्यान राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याआधी काँग्रेस मुख्यालयाबाहेर १४४ कलम लागू करण्यात आलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या