जिल्ह्यातील सहकारी उपसा सिंचन योजनांची कामे प्राधान्याने पुर्ण करा

मंत्री जयंत पाटील यांच्या सुचना; राष्ट्रवादीचे संदीप बेडसेंचा पाठपुरावा
जिल्ह्यातील सहकारी उपसा सिंचन योजनांची कामे प्राधान्याने पुर्ण करा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 22 सहकारी उपसा सिंचन योजनांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सुचना जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्या.

दोन्ही जिल्ह्यातील अपूर्ण अवस्थेतील 22 सहकारी उपसा सिंचन योजनांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मंत्रालय येथे दृकश्राव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत या योजनांची पूर्ण झालेली कामे, अपूर्ण कामे, अडचणी व त्यावरील तातडीने करावयाची अंमलबावणीबाबतची माहिती ना. जयंत पाटील यांनी घेतली.

22 सहकारी उपसा सिंचन योजनांपैकी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आठ सहकारी उपसा सिंचन योजना आहेत. त्यात कमलताई (विरदेल), श्री विंद्यासिनी (धमाने), आशापुरी तापीमाई (पाटण), जयभवानी (निमगुळ), रविकण्या (लोहगाव), भाग्यलक्ष्मी (लंघाने), दाऊळ, मंदाने (दाऊळ), अक्कडसे उपसा सिंचन योजना (नेवाडे) यांच्यापैकी चार उपसा सिंचन योजनांची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.

या ही योजना पूर्ण झाल्यानंतर त्याचा फायदा शिंदखेडा तालुक्यातील 22 गावांमधील 3 हजार 157 शेतकरी बांधवांना होणार असून 5 हजार 223 हेक्टर लाभक्षेत्र (13,057 एकर) सिंचनाखाली येणार आहे.

गेल्या 26 वर्षांपासून या योजनांचा प्रश्न प्रलंबित असून 2007-2008 मध्ये तापी नदीवरील प्रकाशा (62.11 दलघमी) व सारंगखेडा ( 91.81 दलघमी) बॅरेजेसच्या माध्यमातून 153.92 दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यापैकी अंदाजे 17.28 दलघमी पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येत आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला साधारण 136.64 दलघमी पाणी विनवापर राहिल्याने वाया जाते. शिंदखेडा तालुक्यातील 22 गावांचे शेतकरी बांधव गेल्या 12-13 वर्षांपासून आपल्या हक्काचे 33.80 दलघमी पाणी सिंचनासाठी उपलब्ध असताना ही फक्त या आठ उपसा सिंचन योजना कार्यान्वित नसल्याकारणाने त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. ही बाब राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली.

ना.जयंत पाटील यांनी सर्व बाबींचा सखोल आढावा घेवून ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या 115 कोटी रुपये किंमतीच्या सुधारित अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रीया लवकर पूर्ण करणे तसेच प्रामुख्याने शिंदखेडा तालुक्यातील 8 उपसा सिंचन योजनांचा प्राधान्यक्रम ठरवून प्राधान्याने पूर्ण करण्याबाबतच्या सूचना बैठकीस उपस्थित अधिकार्यांना दिल्या.

बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे,जलसंपदा सचिव, जलसंपदा विभागाचे मंत्रालयातील प्रमुख अधिकारी, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री स्वामी, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री.खांडेकर, नंदुरबारचे कार्यकारी अभियंता श्री.चिनावलकर, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) नितीन खडसे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com