Thursday, April 25, 2024
Homeराजकीयवादळग्रस्तांना जाहीर केलेली मदत फसवी

वादळग्रस्तांना जाहीर केलेली मदत फसवी

मुंबई । प्रतिनिधी

कोकणातील वादळग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेली २५२ कोटींची मदत फसवी असून यातून वादळग्रस्तांच्या पदरात काहीच पडणार नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी येथे केली.

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. या मदतीवर दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.

निसर्ग चक्रीवादळानंतर दिलेल्या नुकसान भरपाईपेक्षा अधिक भरपाई देऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. आंबा, सुपारी, नारळ बागायतदारांचे प्रत्यक्षातील नुकसान जाणून न घेताच ही मदत जाहीर केली आहे. वादळग्रस्तांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन मलमपट्टी म्हणून मदत जाहीर केली आहे.नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

कोकणच्या जनतेविषयी आघाडी सरकारला असणारी अनास्था या मदतीतून प्रकट झाली आहे. ही मदत बागायतदार, मच्छीमार यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. विभागीय आयुक्तांकडून नुकसानीबाबत सादर केलेला अहवाल आणि मंत्र्यांकडून सांगितले गेलेले नुकसानीचे आकडे यात मोठी तफावत आहे, असा दावा दरेकर यांनी यावेळी केला.

या पत्रकार परिषदेला आमदार भाई गिरकर, निरंजन डावखरे, मच्छीमार संघटनेचे नेते आमदार रमेश पाटील, माजी आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या