Saturday, April 27, 2024
Homeराजकीयसहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा तीन महिने मुदतवाढ

सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा तीन महिने मुदतवाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे.

- Advertisement -

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत मुदत संपणार्‍या ब वर्गातील 888 संस्था, क वर्गातील 551 संस्था तर ड वर्गातील 246 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 क मधील तरतुदीप्रमाणे राज्य शासनाला नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थानच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार असतो. या तरतुदीनुसार जागतिक आरोग्य संघटनेने जगभर पसरलेला करोनाला साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे.

अद्याप करोना प्रादुर्भाव कमी झालेला नाही. करोना अटोक्यात येण्यासाठी काही अवधी लागणार आहे. दिवसेंदिवस राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशावेळी सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे योग्य होणार नाही. राज्यावर आलेली ही नैसर्गिक आपत्ती विचारात घेता सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दिलेली मुदतवाढ 15 सप्टेंबरला पूर्ण झाले होती. निवडणूका पुढे ढकल्याविषयीचा आदेश सहकार विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी सोमवारी काढला. यापूर्वी 18 मार्च व 17 जून अशी दोनदा निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात आदेश काढण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या