५६ हजार कलाकारांना मदतीचा हात

प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई / प्रतिनिधी
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील ५६ हजार कलाकार, लोककलावतांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. या निर्णयामुळे आर्थिक हलाखीत असणाऱ्या कलावंतांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील शेकडो लोककलावंत,लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोरोनामुळे आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर कलाकारांसाठी एकरकमी कोरोना दिलासा अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले.

ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सांस्कृतिक कार्य विभागाकडील विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कलावंतांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोरोना संसर्गाशी लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.

राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास ८ हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास २८ कोटी रुपये खर्च होणार आहे.

समूह लोककलापथकांचे चालक-मालक आणि निर्माते यांनाही मदत
राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत.शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास ८४७ संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी ६ कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी एक कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपथित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com