आदिवासी बांधवांसाठी नव्या संकल्पना आणा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

खावटी अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाचा शुभारंभ
आदिवासी बांधवांसाठी नव्या संकल्पना आणा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य सरकार करेल. आपण सर्वांनी पुढे येऊन आदिवासी विकासाच्या योजना आणि नवनवीन संकल्पना सरकारसमोर आणाव्यात, सरकार आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.

आदिवासी बांधवांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने झाला. या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आदिवासी बांधवांसाठी ही चांगली योजना सुरू केल्याबद्दल आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि विभागाचे अभिनंदन केले.

सरकार सर्व सामर्थ्यानिशी काम करत आहे. सरकार सत्तेत आल्यावर सुरुवात चांगली झाली. मात्र नंतर कोरोनाचे संकट आले. आपण खूप काही चांगल्या योजना, संकल्पना राबविण्याचे निश्चित केले होते. करोनामुळे याला मर्यादा आल्या. कोरोनाचे संकट अजूनही सुरुच उलट ते अधिक वाढले आहे. यामुळे जगण्यावर काही निर्बंध आले, त्याचा परिणाम म्हणून अर्थचक्र मंदावले, रोजी रोटीवर परिणाम झाला. याचे दुष्परिणाम शहराबरोबरच ग्रामीण आणि आदिवासी भागातही होत आहेत. आदिवासी कुटूंबाना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. ऑनलाईन पद्धतीने आज एकाचवेळी १२ लाख कुटुंबाच्या बँक खात्यात खावटी अनुदानाची रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

आपण शहरी भागात आरोग्य सुविधा निर्माण केल्या. पण दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधा कशी आहे हे पाहण्यासाठी मी मुद्दाम काही महिन्यांपूर्वी नंदूरबारला गेलो. तिथे अतिशय शिस्तीने ज्येष्ठ आदिवासी नागरिक लस घेताना दिसले. आपल्याला शहरात कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगावे लागते, जनजागृती करावी लागते. परंतु,आदिवासी बांधव हे नियम काटेकोरपणे पाळताना दिसले, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.

पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यालाही मी भेट दिली, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पालघर असो, चंद्रपूर असो, नंदूरबार असो हा सगळा भाग जंगलात वसला आहे. येथे निसर्ग सौंदर्य आहे, आदिवासींजवळ जगाला भुरळ पाडणारी स्वत:ची कला आणि संस्कृती आहे. याचा उपयोग करून आदिवासी भागाचा विकास का करू नये, याचा विचार केला आणि त्याअनुषंगाने आपण या भागात विकासाची पावले टाकत आहोत. इथल्या पर्यटनाला चालना देत आहोत. सरकारने आदिवासी बांधवांचा विकास करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून आदिवासींना त्यांच्या पायावर भक्कपणे उभे करून स्वावलंबी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी, आमदार सुनील भुसारा, आमदार विनोद निकोले, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com