
गुवाहाटी | Guwahati
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सुरू झालेला शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील कलगीतुरा अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. बुलढाण्यातील सभेमधून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारचा खोके सरकार असा उल्लेख केला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की,'आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल. काल केसरकर यांनी सूचक विधान केलेलं आहेच. आता सगळ्या दुनियेला माहिती होईल,' असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना दिला.
उद्धव ठाकरेंना नैराश्य आल्याची टीका एकनाथ शिंदेंनी यावेळी केली. “त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्यातून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतंय. मला वाटत होतं की नैराश्य यायला त्यांना फार वेळ लागेल. पण ते आधीच आलं आहे', असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.
दरम्यान, आसामच्या मुख्यमंत्र्यांशीही अनेक विषयांवर चर्चा केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, आसाममध्ये महाराष्ट्र भवन व्हावे, अशी मागणी मी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागणीवर त्यांनी तत्काळ होकार दिला आहे. त्यामुळे आसाममध्ये महाराष्ट्र भवन होणार आहे. महाराष्ट्रातून कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी सोय होणार आहे.