Friday, April 26, 2024
Homeराजकीयशहर शिवसेनेतील वाद विकोपाला

शहर शिवसेनेतील वाद विकोपाला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील शिवसेनेत अंतर्गत गटबाजीतून आरोप-प्रत्यारोपाचे बाण एकमेकांवर सोडले जात असल्याने कलह विकोपाला पोहचला आहे.

- Advertisement -

एका गटाने थेट शहरप्रमुख बदलाची मागणी केली असून त्याला शह देणारे पत्रक काढत गटबाजीची धग वाढविली जात आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या सुटणार्‍या बाणांनी निष्ठावंत नेमके कोण? असा प्रश्न नगरकरांना पडला आहे.

दरम्यान, मातोश्रीवर फक्त निष्ठावान शिवसैनिकांनाच एन्ट्री आहे. तेथे फुटिरवादी लोकांना प्रवेश नाही, असे स्पष्ट करतानाच आपली वैचारिक पातळी पाहूनच बोला, अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर द्यावे लागेल असा इशारा नगरसेवक गणेश कवडे यांनी काका शेळके यांना दिला आहे. शेळके यांनी कवडे यांच्यावर केलेल्या आरोपाला उत्तर देण्यात आले असून त्यात शेळके यांना थेट समोरासमोर येण्याचे आव्हान देण्यात आले आहे.

गत अनेक दिवसांपासून शहर शिवसेनेत फूट पाडण्याचे काम स्थानिक पदाधिकारी करत आहेत. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या काका शेळके यांना शिवसेनेत कुठलेही अधिकृत पद दिलेले नाही. ते स्वयंघोषित पदाधिकारी म्हणून स्वत:ला मिरवित असल्याचा आरोप कवडे यांनी केला आहे.

दरम्यान, प्रत्येक निवडणुकीला पैशासाठी फुटणारे, रात्रंदिवस झिंगाट होणारे असे शेलके शब्द वापरत तुमचे बालिशपणाचे बोलणे थांबवा, वैचारिक पातळी पाहून बोला नसता शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल, असा इशारा कवडे यांनी दिला आहे.

स्वत:च्या वॉर्डात 1600 मतांनी पराभव झाला. स्व. अनिल राठोड यांना तुमच्या वॉर्डात सर्वात कमी मते मिळाली. माझ्या वॉर्डात राठोड यांना सर्वाधिक मते आहेत. निर्लज्जापणासारखे आता तरी खोटे बोलणे सोडा अन् पुरावे घेऊन समोरासमोर या असे थेट आवाहन कवडे यांनी शेळके यांना दिले आहे.

प्रा. शशिकांत गाडे यांचे सचिव देसाई यांना पत्र

मातोश्रीवर नगरसेवकांची तक्रार करण्यासाठी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी स्वत:च हा प्रकार उघड्यावर आणत त्यासदंर्भात शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांना पत्र पाठविले आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी काही नगरेसवकांनी पक्षविरोधी काम केल्याचे पत्र मातोश्रीवर धाडण्यात आले होते. आता ते पत्र जिल्हा प्रमुखांच्या लेटरहेडवर गेल्याचे समोर आले आहे. मात्र,असे कोणतेही पत्र देण्यासाठी मी सही केलेली नाही.

विधानसभा निवडणुकीवेळी विविध परवानग्या घेण्यासाठी कोर्‍या लेटरहेडवर सह्या करून ते स्व. अनिल राठोड यांच्या कार्यालयात ठेवले होते. त्याचा कोणीतरी गैरवापर केला असून त्याच्याशी आपला कुठलाही संबंध नाही,असे पत्र गाडे यांनी खा. देसाई यांना पाठविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या