'..तर आधी महाराष्ट्राचं नामांतर करा', सपा आमदाराचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

नामांतरणावरुन आता चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे
'..तर आधी महाराष्ट्राचं नामांतर करा', सपा आमदाराचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई । Mumbai

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी देखील आपल्या केलेल्या दाव्यांमध्ये सुद्धा मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नामांतराच्या या मागण्यांवर महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध दर्शवला आहे. सपाचे नेते आमदार अबू आझमी यांनी एका व्हिडीओद्वारे भूमिका मांडत महाराष्ट्राचंच नाव बदलण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

यांनी म्हंटल आहे की, “शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल, तर नवी शहरं वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही,” असं आवाहन अबू आझमी यांनी केलं आहे.

“महाराष्ट्रात जगभरातून, देशातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढं घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचं कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.

'..तर आधी महाराष्ट्राचं नामांतर करा', सपा आमदाराचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
औरंगाबादचे नामांतर करण्यास रिपाइंचा विरोध

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंल आहे.

तसेच खासदार संजय राऊत म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भाजपला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भाजपचे गेली पाच वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल उपस्थित करत संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. केंद्रात भाजपची सत्ता असूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com