शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्य सरकारमधील महा विकास आघाडीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला

बळी न पडता सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी दिली.

नववर्षाच्या निमित्ताने भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी काल गुरुवारी सायंकाळी धुपारतीनंतर साई दरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे त्याचप्रमाणे आरोप प्रकरणाबाबत पोलिसांचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे,

मात्र या प्रकरणात आणखी काही लोकांनी संबंधित तरुणीच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची माहिती माझ्या कानावर आली. यात तथ्य असेल तर याचा तपास पोलीस यंत्रणांकडे असल्याने सगळ्यांचे लक्ष पोलिसांच्या भूमिकेकडे आहे. त्यामुळे जे काही सत्य असेल ते पोलिसांनी जनतेच्या समोर मांडावे.

या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. ब्लॅकमेल केले जाते की खरच त्या तरुणीवर अत्याचार होतोय या गोष्टी पोलिसांनी समोर आणणे गरजेचे आहे. एका जबाबदार मंत्र्यांवर अशा गंभीर स्वरूपाचे आरोप होत असताना पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावला पाहिजे,असे मत वाघ यांनी व्यक्त केले.

मला आश्चर्य वाटत आहे या गोष्टीचे की दहा निष्पाप बालकांना जळून मरावे लागले संपूर्ण राज्यातील हॉस्पिटलचे ऑडिट होण्यासाठी, आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले होते की 48 तासांच्या आत दोषींवर कारवाई करू, मात्र 48 तास उलटून गेल्यानंतर मुंबईची फायरब्रिगेडची पथके भंडारा येथे रवाना झाली आहेत, त्यामुळे या प्रकरणात सरकारला किती संवेदनशीलता आहे हे बघायला मिळत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मी सुद्धा एक आई आहे. त्या मातांवर काय बाका प्रसंग आला हे शब्दांत सांगणे कठीण आहे. परंतु सरकारची असंवेदनशीलता मात्र निश्चित दिसून आली आहे. सरकारमधील मंत्र्यांचा दौरा सहानुभूतीचा होता की फक्त विदर्भाचा दौरा व्हावा म्हणून त्याठिकाणी गेले होते असा आमचा प्रश्न आहे.