'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात'

चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात'

मुंबई | Mumbai

एका पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करत आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मी करत आहे. न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणं आवश्यक होतं. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचं आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात,” तसेच “वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते”.

नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण...; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

महाराष्ट्र सरकार मधील महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने तीन महिने तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कामावर असलेल्या पोलिसाला थप्पड मारल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, "गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण 'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?." दरम्यान, यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली असून भाजपने त्यांंच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.

राजीनाम्याच्या मागणीवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

या सगळ्या प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल', असं यशोमती ठाकूर निकालानंतर म्हणाल्या.

भाजपने केलेल्या राजीनामा देण्याच्या मागणीबाबत त्या म्हणाल्या, 'एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.'

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com