शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ व्हायरल होताच रावसाहेब दानवेंकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “तो व्हिडीओ…”

शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा व्हिडीओ व्हायरल होताच रावसाहेब दानवेंकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “तो व्हिडीओ…”

मुंबई | Mumbai

भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं सुरूच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती.

हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे म्हणत या वादात भर घातली. यानंतर केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचादेखील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत.

दरम्यान, या व्हिडीओनंतर दानवे यांच्यावरदेखील टीका केली जात होती. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.

रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे की, काही माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असे वृत्त दिले आहे. मात्र या दोन वर्षांमध्ये मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन वर्षांपूर्वी मी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, नाशिकचा २ वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखे दाखवण्यात येत आहे. माझ्या त्या विधानाची मी तेव्हाच माफी मागितली होती. आताही पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो. आज मी शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी ते वक्तव्य आज केल्याचे दाखवले जात असून ते चुकीचे आहे.

नेमके काय म्हणाले रावसाहेब दानवे?

राज्यात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्याप्रकरणी प्रतिक्रिया देतानाचा रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याची चौकशी व्हायला हवी. वक्तव्य वादग्रस्त होईल की नाही, हे तपासण्यात यावे, असे सांगताना रावसाहेब दानवे दिसत आहेत. तसेच आपणही शिवप्रेमी असल्याचे रावसाहेब दानवे नमूद करत आहेत. मात्र, याच व्हिडिओत पुढे बोलताना दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com