
मुंबई | Mumbai
राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Arakshan) लढा दिवसेंदिस तीव्र होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य सरकारकडून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीवर संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati SambhajiRaje) यांनी बहिष्कार (Boycott All Party Meeting) टाकल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवलेली पाहायला मिळाली.
छत्रपतींनी मराठा आरक्षण प्रश्नी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातल्याची माहिती मिळत आहे. संभाजीराजे छत्रपतींनी स्वतः यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षणापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.
छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे, राज्यात आत्महत्या होत आहेत, मराठा आंदोलन तीव्र होत आहे. तरीदेखील सरकार केवळ बैठकांचा खेळ करीत आहे. अशा बैठकांमध्ये वेळ न दवडता सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ या विषयामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, हीच आमची अंतिम मागणी आहे. असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
"गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय असताना कोणत्याही सरकारने समाजासाठी बोलाविलेल्या एकाही शासकीय बैठकीस मी अनुपस्थित राहिलो नाही. दोन वेळेस आरक्षणही मिळाले होते मात्र मागील सरकारच्या घोडचुकांमुळे दुर्दैवाने मराठा आरक्षण रद्द झाल्याचेही छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणले आहे.
"सध्या आरक्षणाच्या नावाने केवळ पोकळ बैठकांचे सत्र चालू असल्याचे दिसून येत आहे. यातून कोणताही मार्ग निघत नाही अथवा आरक्षण कसे देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय मंडळी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात मात्र मार्ग सांगत नाहीत.
मराठा समाजाला आरक्षण देणे यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.", असे ही संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.