
मुंबई | Mumbai
मराठा समाजाला (Maratha Community) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवला आहे. काल भुजबळ यांनी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याविरोधात आवाज उठवला होता. तसेच ओबीसी समाजाला आपले आरक्षण (Reservation) वाचवण्यासाठी जमेल त्या मार्गाने विरोध करण्याचे आवाहन केले होते.
भुजबळांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी समाजाचे नेते एकवटायला सुरुवात झाली असून आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी ओबीसी नेत्यांची (OBC leaders) बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा होणार असून ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील? यावर बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीस प्रकाश शेंडगे, जे.पी. तांडेल, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह इतर ओबीसी नेते आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत ओबीसी नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाडे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेदेखील आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात बोलण्यासाठी कोणताही ओबीसी नेता पुढे येत नाही. फक्त छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे दोनच नेते उघडपणे ओबीसी आरक्षणावर बोलत आहेत. छगन भुजबळांनी काल भूमिका मांडली की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. फक्त ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला नको, असे मत बबनराव तायवाडे यांनी मांडले.
बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी होणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. या मुद्द्यावरदेखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास त्याचा इतर ओबीसींवर काय परिणाम होऊ शकतो. याची या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.