राज्यात टोळीचे सरकार चालू आहे का ? - चंद्रकांत पाटील

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल
राज्यात टोळीचे सरकार चालू आहे का ? - चंद्रकांत पाटील

पुणे |Pune

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यास पुणे महानगरपालिकेत गेले असताना शिवसैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली असून गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. भाजपा हा विषय सोडणार नाही आणि किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिला.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या इमारतीत गेले असता शिवसैनिकांनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. राज्यात टोळीचे सरकार चालू आहे का ? याबद्दल आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सोमय्या यांना झेड सुरक्षाव्यवस्था असल्याने त्यांच्या भेटीच्या आधी पोलिसांनी तपासणी करणे आवश्यक असते. तरीही त्यावेळी शंभरजण इमारतीत लाठ्या व दगड घेऊन कसे होते, पुणे महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्थाही काय करत होती, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनाही धक्काबुक्की झाली. केंद्र सरकारने या हल्ल्याची दखल घेतली आहे. केंद्र सरकारचे सुरक्षा प्रमुख तीन दिवस पुण्यात आहेत. त्यांनी पुण्याच्या पोलीस प्रमुखांनाही नोटीस दिली आहे.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय मजुरांना भरवसा देण्यात राज्याचे सरकार कमी पडले व त्यामुळे त्यांनी पलायन केले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या सर्वाचा जाब खरे तर काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा होता व त्यांच्याकडे माफीची मागणी करायला हवी होती.

किराणा दुकानांमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी, परमविरसिंग यांनी सचिन वाझेबाबत आरोप केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे टाळणे, पोलिसांच्या बदल्यांबाबत अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतरही परब मंत्रिपदावर चिटकून राहणे यांच्या विरोधात भाजपा लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांचा वाईनला पाठिंबा असल्याचा केलेला दावा धक्कादायक आहे. त्या एका सुसंस्कृत कुटुंबातील आहेत. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना लाभ होण्यासाठी त्यांनी असे विधान करू नये, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com