तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात - चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात - चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधि) – महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये धुसफूस सुरु आहे हे तर आम्ही वारंवार सांगत आलो आलो आहोत. शेवटी तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात. कधीतरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत. आणि आगामी काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी प्रकरणे बाहेर येतील अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात काही औषधांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. यावरून प्रशासकीय अधिकारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असतं पाटील यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

लॉकडाऊनच्या काळात मी आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जेवढे महाराष्ट्रात फिरत आहोत, तेवढे धाडस कोणीही करत नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले. हे सरकार आपापसातील भांडणं किती दिवस लपवून ठेवणार आहे. केव्हातरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत. परवानगी न घेता जयंत पाटलांनी पीएची नेमणूक केली, हा विषय चव्हाट्यावर आला. जयंत पाटलांच्या जलसिंचन विभागाच्या काही फायली या मंत्रीमंडळ संमतीनंतरही फायनान्सकडे गेल्या आहेक. तसेच, असे खूप विषय आहेत. आणखी काही दबलेले विषय दोन-तीन दिवसांत बाहेर येतील. तसेच यावर काही बोललं, की सामनात अग्रलेख छापून येतात असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण व रोजगारासाठी सवलती मिळणे गरजेचे आहे. फडणवीस सरकारने राबवलेले ‘जे ओबीसींना ते मराठ्यांना’, हे सूत्र अंमलात आणावे. त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणीही पाटील यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांना उपरोधिक टोला..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या निमित्ताने का होईना बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खरंतर मराठा आरक्षण, कोविड संकट यांच्याबाबतीत डबल मास्क, पीपीई किट घालून एक ते दीड वर्षांपूर्वीच या गोष्टी करायला हव्या होत्या. मात्र, आता का होईना ते भेटी गाठी घेत आहेत ही त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणावी लागेल अशा शब्दात पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना उपरोधिकपणे टोला लगावला आहे.

त्याची काळजी अशोक चव्हाणांनी करू नये

मी नैराश्यात आहे, की माझे मानसिक संतुलन बिघडले आहे, याची काळजी करण्यासाठी भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर समर्थ आहेत. त्याची काळजी अशोक चव्हाणांनी करू नये, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना लगावला आहे. चव्हाण यांनी नुकतीच चंद्रकांत पाटील यांच्यावर 'पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे', अशी टीका केली होती. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका वारकऱ्याला वापरलेले अपशब्दावरुन त्यांच्यावर सर्व समाजातूनच टीकेची झोड उठविली जात आहे. या प्रकरणावर भाष्य करताना पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हम करे सो कायदा, अरेरावी, भ्रष्टाचार हा स्थायीभाव आहे.आता त्यांच्याबरोबर सत्तेत राहून शिवसेनेला त्यांचा हा गुण लागला आहे. एका शिवसेनेच्या आमदाराने माझ्या कार्यालयात चिठ्ठी घेऊन येऊन येणाऱ्या नागरिकांनाच लस मिळेल अशाप्रकारचा फतवा काढला आहे. यावर काँग्रेसच्या आमदारानेच प्रत्युत्तर केले आहे. असेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com