Friday, April 26, 2024
Homeराजकीयन्यायालयात भाजपाने मराठा आरक्षण टिकवले, महाविकास आघाडीने ते हिरावले - आ.सदाभाऊ खोत

न्यायालयात भाजपाने मराठा आरक्षण टिकवले, महाविकास आघाडीने ते हिरावले – आ.सदाभाऊ खोत

चाळीसगाव – Chalisgaon – प्रतिनिधी :

राज्यात तीन तिघाडी सरकार आल्यापासून तीनही पक्षांकडून जनतेची लुट व वसुली सुरु करण्यात आली. आजवर हाताने नोटा मोजायचे एकले होते, मात्र वसूली केलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन सापडणे हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा घडले.

- Advertisement -

मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात टिकवले, महाविकास आघाडी मधील प्रस्थापित मराठयांनी सर्वोच्च न्यायालयात सरकारची कमकुवत बाजू मांडल्याने ते हिरावले गेल्याची टिका रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषी व पणनमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

चाळीसगाव येथे रयत क्रांती संघटना व भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील हॉटेल ग्रीनलीफ येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.व्यासपीठावर आमदार मंगेश चव्हाण, रयत क्रांती संघटना प्रदेश प्रवक्ता भानुदास शिंदे, पुणे युवा जिल्हाध्यक्ष गणेश साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉ.हिम्मत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, डॉ.अजय पाटील, विजय उर्फ पप्पू पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते आ.खोत म्हणाले की, वतनदारी, सुभेदारी वृत्तीच्या प्रस्थापित मराठ्यांना विस्थापित गरीब मराठा समाज मोठा होऊ नये असे शिवकाळापासून वाटत आले आहे. तर दुसरीकडे लोकसंखेच्या आकडा न देता आल्याने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, वसुली करायला वेळ मात्र ओबीसी जनगणना करायला वेळ नाही. त्यामुळे मराठा ओबीसी धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. राज्यभरातील बळीराजा अनंत अडचणीत आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असतांना बँका पीक कर्ज देण्यास नकार देत आहे. बहुतांशी ठिकाणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम मिळण्याची प्रतिक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी कष्टकरी सोबतच मराठा ओबिसी, बारा बलुतेदार वर्गाचा भ्रमनिरास झाला आहे.

पुढे ते म्हणाले की, एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात उसाला ३ हजार रुपये भाव मिळत असताना इकडे जळगाव जिल्ह्यातील उसाला २३०० प्रमाणे भाव देऊनदेखील अजून पहिला हफ्ता सहा महिन्यांपासून मिळाला नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आमचे सरकार असताना साखरेचा भाव २९ रुपयावरून वरून ३२ रुपये केला, इथेनॉल १० वरून २० टक्के केले. सोयाबीन आयात बंद करुन भाव दिला. महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांना १ रुपया अनुदान सुद्धा दिले नाही. शेतकर्‍यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार, आडत नियमनमुक्ती, संत शिरोमणी सावता माळी भाजीपाला बाजार अश्या योजना कृषी विभागाने राबवल्या मात्र मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्याना देखील भरपाई मिळालेली नाही.

आपल्या मनोगतात आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, भाजपा सरकारच्या काळात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व पणनमंत्री असताना अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. शेतकरी बाजार ही अभिनव संकल्पना राज्यात राबवली, कांदा उत्पादकांना सबसिडी, मागेल त्याला शेततळे, कांदाचाळी यामुळे शेतकरी सक्षम झाला. सध्याचे महाविकास आघाडी सरकार आंधळ्या बहिर्‍याचे सरकार आहे. सत्ताधारी आमदारांना वीज कंपनी विरोधात आंदोलन करावे लागते. ज्यांनी नियमित कर्ज फेडले त्यांना अनुदान दिले नाही व २ लाखावर थकीत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफी पूर्ण केली नाही. शेतकर्‍यांचे ज्वारी मका खरेदी केली जात नाही तर बोगस बियाणे व खते यांचे मोठे रॅकेट सरकारच्या आशिर्वादाने सुरु आहे. मात्र एक शेतकर्‍याचा मुलगा या नात्याने त्यांच्या प्रश्नांसाठी कधीही रस्त्यावर उतरायला तयार आहे.

आठवणीना उजाळा

सदाभाऊ खोत यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणीना उजाळा दिला व त्यांची आमदार होण्यापूर्वीची वेगळी ओळख उपस्थिताना करून दिली, शेतकरी आंदोलन दौरे व मंत्री असताना अनेक वेळा चाळीसगाव येथे येऊन गेलो मात्र विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांची आणि माझी ओळख ही मात्र मुंबई येथे ते आमदार नव्हते तेव्हा दवाखान्यात रामेश्वर नाईक यांच्यासोबत झाली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीषभाऊ महाजन, रामेश्वर नाईक यांचे आरोग्यसेवेचे मोठे काम राज्यात उभे राहिले त्यात मुंबई येथे मंगेश चव्हाण हे माझ्या मतदारसंघातील रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी नेहमी सहकार्य करायचे.

गोर गरिबांची सेवा केल्याचे फळ त्यांना आमदारकीच्या रूपाने मिळाले. मात्र आमदार झाल्यानंतर सुद्धा ते शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी १२ दिवस जेलमध्ये गेले. गेल्या ६ महिन्यांपासून रावळगाव कारखान्याचे थकलेले पैसे त्यांनी मिळवून देण्यासाठी यशस्वी लढा उभारला.

हे काम संवेदना असणारा लोकप्रतिनिधीच करू शकतो व असा आमदार तुम्हाला मिळाला असल्याने पुढील काळात माझ्याकडून, संघटनेकडून जी काही मदत लागेल ती मी नक्की करेन असे देखील खोत यांनी सांगताच उपस्थित शेतकरी बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. रयत क्रांती संघटना, भारतीय जनता पार्टीचे, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या