आमदारांनी बैलगाडीवर स्वार होवून केला महागाईचा विरोध

jalgaon-digital
2 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महागाई विरोधात आ. फारूक शाह यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी बैलगाडीवर स्वार होत मोर्चाने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. याबाबत जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देण्यात आले.

देशभरात पेट्रोल-डीझेल, गॅस तसेच धान्य, डाळी आणि खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. असे असतांना केंद्र सरकार कुंभकर्णाच्या झोपेसारखे सोंग करत आहे. पेट्रोल 100 रुपयांच्या वर तर डीझेल देखील 92 रुपयांवर येऊन पोहचले आहे.

खाद्य तेलाने 150 रुपये पार केले असून डाळी देखील 100 रुपयांच्यावर झाल्या आहेत. घरगुती गँस 850 रुपये झाला असून त्यावरील सबसिडी बंद केली आहे. केंद्र शासनाचा पेट्रोल 33 रूपये व डिझेल 32 रुपये प्रती लिटर आकार आहे.

तसेच राज्य सरकार व्हॅटच्या नावावर 25 टक्के प्रति लिटर पेट्रोल व 22 टक्के डिझेलवर आकारीत आहे. सर्वसामान्य जनतेची लूट केली जात आहे. या दरवाढीवर केंद्रात असलेल्या भाजप आणि मोदी सरकारचे नियंत्रण राहिले नसून देशातील सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.

आ. फारूक शाह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा एमआयएम पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

भाजप सरकारने लवकरात लवकर महामार्ग कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरवाढ मागे घेतली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

आंदोलनात एमआयएमचे जिल्हाध्यक्ष युसुफ मुल्ला, शहराध्यक्ष नुरा शेख, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक, शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, नगरसेवक सईद बेग, युवक जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, शहराध्यक्ष शेहबाज शाह, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष नजहर खान, शहराध्यक्ष हमीद अन्सारी आदी सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *