Monday, April 29, 2024
Homeराजकीय'मराठी भाषा गौरव दिवस' जोरदार साजरा करा

‘मराठी भाषा गौरव दिवस’ जोरदार साजरा करा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

येत्या २७ फेब्रुवारीला होणारा ‘मराठी भाषा गौरव दिन’ ( Marathi Bhasha Gaurav Din )जोरदारपणे साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray )यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

- Advertisement -

‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळले पाहिजे की आज ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेव्हढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा. संपूर्ण राज्यात ह्या दिवसाच्या निमित्तानं मराठीमय वातावरण करा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालणाऱ्या राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा आपल्या पक्षासाठी तितकाच महत्वाचा असल्याचे आजच्या आवाहनातून अधोरेखित केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे मराठी अस्मितेच्या मुद्द्याला पुन्हा हात घालणार असल्याचे संकेत मनसेने दिले आहेत.

२७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस ( Kusumagraj Jayanti ). हा दिवस आपण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा करतो. ‘गौरव दिवस’ पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये हा दिवस होता. परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पध्दत आपण, आपल्या पक्षानी सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

हा आपल्या भाषेचा ‘गौरव’ दिवस आहे, तो त्याच जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा. आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे,असे राज ठाकरे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. ह्या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा ‘गौरव’ दिवस आहे हा. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी थोर समाजसेवक , स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण, ह्या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचीही भाषा मराठीच ! अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा, असे ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या