करंजी |वार्ताहर| Karanji

निवडणुका म्हटलं की सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यातून रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना राबवण्याच्या

संदर्भात मतदारांना विविध प्रकारची आश्वासने देतात परंतु पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करडवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जय भोलेनाथ ग्राम विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरनाम्याद्वारे पाच वर्षांच्या कार्यकाळात जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर होमहवन करून पाऊस देखील पाडू, असे जाहीरनाम्यातून आश्वासन दिल्याने मतदारांना देखील डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

पाथर्डी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून प्रचार देखील आता शिगेला पोहोचला आहे. एकूण 75 ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या सुरू असून यामध्ये विविध पॅनल मंडळाकडून मतदारांना जाहीरनाम्याच्या माध्यमातून विविध आश्वासने दिली जात आहेत. रस्ते, वीज, पाणी, घरकुल, शौचालयासारखे विविध प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन देणारे जाहीरनामे अनेक गावांतून पाहण्यास मिळाले आहेत.

मात्र शिरापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या करडवाडी येथील जय भोलेनाथ ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या जाहीरनाम्यामध्ये पाच वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर गावांमध्ये दोन हरिनाम सप्ताह केली जातील त्याचबरोबर यज्ञ हवन करून वरूणअस्त्राचा सिद्ध प्रयोग करून संत नवनाथ व महादेवाच्या कृपेने होमहवन करून गावात पाऊस देखील पाडला जाईल, असे आश्वासन जाहीरनाम्या द्वारे वॉर्ड क्रमांक 1 मधील उमेदवार मनोज झुंबर कराड यांनी मतदारांना दिल्याने गावातील मतदारावर देखील डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

पाऊस पाडण्याच्या आश्वासनांसह पाच वर्षे मतदारांसाठी शासनाच्या विविध योजना मार्गी लावण्यासाठी त्यांचे मोफत पासपोर्ट फोटो काढून दिले जातील, त्यांच्याकडील कागदपत्राची मोफत झेरॉक्स काढून दिल्या जातील तसेच शासनाच्या डिजिटल लॉकर या योजनेंतर्गत गावातील सर्व ग्रामस्थांचे सर्व मुख्य कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर मोफत स्कॅन करून सुरक्षित ठेवली जातील.

शौचालय ,व्यायाम शाळा उभारल्या जातील तसेच गावातील धार्मिक, परमार्थिक परंपरा अबाधित राहण्यासाठी व तरुण निर्व्यसनी होऊ नयेत म्हणून दर महिन्याच्या एकादशीला गावात कीर्तन सेवा ठेवण्याचे देखील आश्वासन या उमेदवाराने दिले आहे.

या उमेदवाराच्या हटके आश्वासनामुळे गावात चांगलीच या जाहीरनाम्याची चर्चा रंगली असून हा विषय सध्या सोशल मीडियावर देखील चांगलाच रंगला आहे. शिरापूर येथील एका अपक्ष उमेदवाराने शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर जाहीरनाम्याद्वारे आश्वासने दिल्याची चर्चा सुरू असतानाच करडवाडी जमीन मोजणी त्यापुढे आणखी दोन पाऊल टाकून सर्वांना चर्चा करायला भाग पाडणारा जाहीरनामा मतदारांसमोर ठेवला आहे.