दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप, जयंत पाटलांची खोचक टीका

दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप, जयंत पाटलांची खोचक टीका

मुंबई | Mumbai

दुष्काळग्रस्त, विकासाचा मोठा अनुशेष असलेल्या मराठवाड्यात आज, शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी (17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे.

यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी दोन दिवस शहरात मुक्कामी असणार आहेत. मंत्रिमंडळाची बडदास्त ठेवण्यासाठी शहरातील पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. दुष्काळी परिस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीला उत्सवाचे रूप दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे. पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न आहे.

शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं. इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही. दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com