मुंबई l प्रतिनिधी

भाजपकडून जाती-धर्मात विष कालवण्याचे, समाजा-समाजात तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याचे काम सुरु आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे ते चिरडून टाकण्याचे काम केले जात आहे. यातून भाजप सरकार देश रसातळाला घेऊन जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केला.

आज टिळक भवन येथे काँग्रेसचा स्थापन नादिन साजरा करण्यात आला. त्यावेळी थोरात यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा एकदा सर्वांना बरोबर घेऊन एकजुटीने देश उभा करण्याचे काम काँग्रेसला करावे लागणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे महत्वाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरही सर्वांना बरोबर घेऊन देशाला उभे करण्याचे काम काँग्रेसने केले . पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी विकासाची मुहूर्तमेढ लावली ती पुढे लालबहाद्दुर शास्त्री, इंदिराजी, राजीवजी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीपथावर राहिली.

देशात विविध स्वायत्त संस्था उभ्या राहिल्या, औद्योगिक विकासाची गंगा वाहिली. मोठ-मोठे प्रकल्प उभे राहिले. इंदिराजी गांधी यांनी भारत एक शक्तीशाली देश असल्याची ओळख जगाला करुन देण्याचे काम केले. परंतु दुर्दैवाने २०१४ नंतर देशातील वातावरण बदलले, असे थोरात यांनी सांगितले.

काँग्रेसच्या स्थापनेमुळे देशाची एक राष्ट्र म्हणून जगाला ओळख झाली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलने करून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष केला. मीठाचा सत्याग्रह, अहसहकार चळवळीच्या माध्यमातून देशात सर्वांना बरोबर घेऊन एक लढा उभा राहिला. १९४२ ला चले जाव ची हाक दिली गेली आणि नंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्य लढ्यात सर्व देश एकजुटीने काँग्रेसच्या झेंड्याखाली एकवटला. भारताला एक वैभवशाली राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेसची महत्वाची भूमिका राहिली आहे. आजची परिस्थीती वेगळी आहे ती बदलण्याचे काम करावे लागणार असल्याचेही थोरात म्हणाले.

यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, कार्याध्यक्ष मुज्जफर हुसेन, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, सरचिटणीस मोहन जोशी, चंद्रकांत हांडोरे, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.