सरकारच्या बदनामीसाठी भाजपचे नियोजित कारस्थान - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

सरकारच्या बदनामीसाठी भाजपचे नियोजित कारस्थान -  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

महाविकास आघाडी सरकारच्या ( Mahavikas Aaghadi government ) मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांची भेट घेतात, असा आरोप करत हे नियोजित कारस्थान असून योग्यवेळी ते उघड करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी दिला.

मलिक म्हणाले, काही आयपीएस, आयएएस अधिकारी मंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे नियोजित कटकारस्थान असते. त्यांच्या भेटी आम्ही योग्य वेळी उघड करणार आहोत. काही अधिकाऱ्यांच्या फडणवीस यांच्यासोबत बैठका झाल्या होत्या. आघाडी सरकारविरोधात ठरवून कारस्थान केले जात आहे. कोणते अधिकारी आणि विरोधी पक्षनेते आरोप करण्यापूर्वी कुठे भेटले याची माहिती जाहीर करु, असे मलिक यांनी सांगितले.

देशातील तपास संस्थांचा सध्या राजकीय वापर होतो आहे, हे आता लपून राहिलेले नाही. ईडी आणि सीबीआयच्या कार्यपद्धतीवर आता न्यायालयानेच प्रश्नही उपस्थित केले आहेत. ते आम्हाला जेवढे हैराण करतील तेवढी जनता आमच्यासोबत राहील, असा दावा मलिक यांनी केला.

भाजप विरोधी पक्षांचे सरकार ज्या राज्यात आहे, त्या सरकारला बदनाम करण्यासाठी, त्या सरकारमधील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट रचला जात आहे. अनिल देशमुख, भावना गवळी, अनिल परब, प्रताप सरनाईक, संजय राऊत या सर्वांना राजकीय हेतूने लक्ष्य केले गेले. हे सर्व कारस्थान भाजप करत आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.

दरेकर यांनी आरोप फेटाळला

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar )यांनी मलिक यांचा आरोप फेटाळून लावला आहे. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत कामानिमित्त अधिकारी हे माजी मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेत्यांना भेटत असतात. त्यामुळे त्याचा अर्थ वेगळा काढणे योग्य नसल्याचे दरेकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्‍यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले हा मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्‍या-आता बहाणे’ असा प्रकार आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com