
मुंबई / प्रतिनिधी
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महापुरूषांबाबत केलेल्या अवमानजनक वक्तव्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आज, शनिवारी महामोर्चाचे आयोजन केले असताना भाजपने या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आजच माफी मांगो आंदोलनाची हाक दिली आहे. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी शुक्रवारी या आंदोलनाची ही घोषणा केली असून त्यांनी आता उद्धव ठाकरे गप्प का? असा सवाल केला आहे...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यावरून आशीष शेलार यांनी आज जोरदार टीका केली. आपले अज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत. यांची मस्ती आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळावरुन खोटी माहिती पसरविण्यापर्यंत गेली आहे. ही खोटी माहिती पसरविणे अक्षम्य चूक आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का होतोय? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत उद्धव ठाकरेंच्या सेनेचे इतके अज्ञान? असा प्रश्न शेलार यांनी केला.
सुषमा अंधारे यांची वक्तव्ये सध्या समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान हा महाराष्ट्र द्रोह नाही का? असा उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान करणे, हिंदू मनाला इजा पोहोचली जाईल, अशी वक्तव्ये समाजमाध्यमांवर आल्यानंतर उद्धव ठाकरे मौन सोडायला तयार नाहीत, मग कसले डोंबलाचे मोर्चे काढत आहात का? हिंदू देवदेवतांचा अपमान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्यांच्याविरोधात भाजपतर्फे १७ डिसेंबरला मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात "माफी मांगो" आंदोलन करण्यात येणार आहेत.
उद्धवजी माफी मागा, अजित पवार माफी मागा, नाना पटोले माफी मागा... याबाबत भाजपा निदर्शने करणार आहे. यापुढे देखील आम्ही हा विषय सोडणार नाही, असेही शेलार म्हणाले.
प्रभूरामाच्या नावावर खिशे भरणाऱ्यांनी हिंदू देवदेवतांवर बोलू नये : पटोले
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भाजपची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन करण्याची नौटंकी भाजप करत आहे. महापुरुषांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपच्या वाचाळविरांविरोधात मूग मिळून गप्प बसणारे आता मात्र महापुरुष आणि हिंदू देवतांच्या नावाखाली आंदोलन करत आहेत. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असून याला ‘चोराच्या उलट्या बोंबा’, असे म्हणतात, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार प्रसाद लाड यांनी महापुरुषांबद्दल काढलेले उद्गार हे महापुरुषांचा आणि त्यांच्या कार्याचा अपमान करणारेच होते, त्यात दुमत नाही. पण भाजपच्या एकाही नेत्यांने या वाचाळविरांवर कारवाई केली नाही आणि माफी मागण्याचे सौजन्यही दाखवले नाही. उलट या वाचाळविरांचा बचाव करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्यासाठी भीक मागितली असे म्हणून त्यांचा अपमान केला. त्यावेळी आमदार आशीष शेलार कुठे होते? असा सवाल पटोले यांनी केला.