
मुंबई | Mumbai
नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपा पदाधिकाऱ्याकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या धक्काबुक्कीचा व्हिडीओ शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. ‘हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे,’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
नागपूर येथील उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी निवासस्थानाबाहेर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपा युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुकी केली. तसेच, पोलिसांच्या कॉलरला हात घातल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत व्हिडीओ शेअर करत म्हणाले, हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट, नागपूर. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपा युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्काबुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता.