आघाडी सरकार विरुद्ध राज्यभर आंदोलन करणार- भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

आघाडी सरकार विरुद्ध राज्यभर आंदोलन करणार- भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

मुंबई | प्रतिनिधी

घटनाबाह्य कृती, लोकशाही विरोध, सत्तेची मस्ती आणि प्रशासनाचा दुरुपयोग अशा कितीतरी अनैतिक कृत्यांची शृंखला महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असून भाजप या अहंकारी सरकारला वठणीवर आणण्यासाठी राज्यभर एल्गार आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी बुधवारी दिली.

घटनाबाह्य कृतीची परंपरा महाविकास आघाडी सरकारने सुरू केली तिचा शेवट भाजपचा कार्यकर्ता एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत मुनगंटीवार यांनी या आंदोलनामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आज पाटकर परिषदेत बोलताना केले.

सर्व प्रकारचे विक्रम मोडीत काढत ठाकरे सरकारने 'मुख्यमंत्र्यांशिवाय अधिवेशन' हा नवा विक्रम हिवाळी अधिवेशनात प्रस्थापित केला आहे. माझ्या २७ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच बघितला आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

विधिमंडळ हे कायदे बनविण्याचे पवित्र ठिकाण आहे. कायदे बनवताना किमान सर्व पक्षांसोबत, अनुभवी सदस्यांसोबत चर्चा करणे अपेक्षित आहे. परंतु विद्यापीठ आणि शैक्षणिक धोरणांबाबत सुधारणा विधेयक मांडताना विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला नाही. विद्यापीठ म्हणजे जणू काही युवा सेनेचे अड्डे व्हावीत अशीच धारणा ठेवून या कायद्यांमध्ये तरतुदी केल्या आहेत, असा आरोप मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

राज्यपालांना सतत अपमानजनक पद्धतीने वागणूक देणे, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, विमानातून त्यांना उतरविणे या सगळ्या बाबी राज्याच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आघाडीच्या काळात कर्ज वाढले

फडणवीस सरकारच्या काळात राज्यावरील कर्जाचा भार वाढला हा अपप्रचार आहे. फडणवीस सरकार सत्तेत आले त्यावेळी राज्यावर २ लाख ९४ हजार २६१ कोटींचे कर्ज राज्यावर होते. आम्ही सत्ता सोडली त्यावेळी राज्य ४ लाख ५१ हजार ११४ कोटींचे कर्ज होते. मात्र आघाडी सरकारच्या काळात १ लाख ६४ हजार ५६ कोटींचे कर्ज वाढले, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com