भाजपाकडून शहरातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न - हिलाल माळी

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्याचे बनावट क्लीपव्दारे बदनामी
भाजपाकडून शहरातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न - हिलाल माळी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेत सर्वच विभागात प्रचंड भष्ट्राचार सुरू आहे. या काळ्या पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे राजकारण सुरू आहे.

महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे शिवसेनेच्या माध्यमातून बाहेर काढली. यापुढेही अशी प्रकरणे बाहेर येतील, याचा धसका घेवून माझ्यासह शिवसेनेची बदनामी व्हावी, या हेतूने गलीच्छ आणि खालच्या पातळीचे राजकारण करून शहराची शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे भाजपाचे कट-कारस्थान करत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी पत्रपरिषदेत केला.

यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील,आधार हाके, मनोज मोरे, संजय वाल्हे, डॉ. सुशील महाजन, युवा सेनेचे अ‍ॅड. पंकज गोरे, राजेश पटवारी, बबन थोरात, संदीप सुर्यवंशी आदी उपस्थित होते. हिलाल माळी यांच्या बाबतची बदनामी कारक ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. त्याबाबत त्यांनी आज पत्रपरिषदेत आपली भुमिका मांडली.

हिलाल माळी म्हणाले की, गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. भाजपाला विकास काम करता यावे म्हणून आम्ही सुरूवातीचे एक वर्ष विरोध केला नाही. मात्र या अडीच वर्षात धुळेकरांना कुठल्याच प्रकारची मुलभूत सुविधा मिळू शकली नाही. काम योग्य होत नसल्याचे दिसून आले. शहरात स्वच्छतेचे तिनतेरा झाले आहे. भुमिगत गटारी, रस्ते कामात भ्रष्टाचार सुरू आहे. पिण्याचे पाणी वेळेत मिळत नाही. याबाबत शिवसेनेच्या माध्यमातून सतत आवाज उठवून निवेदन देत आंदोलन सुरू ठेवली.

म्हणूनच अस्वस्थ होवून संतापलेल्या भाजपाचे महापौर चंद्रकांत सोनार व नगरसेवक पुत्र देवा सोनार यांनी माझ्या व माझ्या पक्षाची बदनामी होईल, अशी बनावट क्लीप व्हायरल करून माझ्या चारित्र्यावर हल्ला केल्याचेही हिलाल माळी यांनी सांगितले पंरतू माझ्या चारित्र्यावर असे कितीही हल्ले झाले तरी मी विचलीत होणार नाही, असे सांगत शहरातील राजकारण्यांनी सामाजिक भान न ठेवता खालच्या दर्जाची पातळी गाठली आहे. म्हणून तरूणांनी देखील जागृत रहावे. गलीच्छ राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com