देवेंद्र फडणवीस यांच्यांवर बिहार निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी

भविष्यातील मोठ्या जबाबदारीची नांदी?
देवेंद्र फडणवीस यांच्यांवर बिहार निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी
देवेंद्र फडणवीस

मुंबई/ Mumbai

राज्यात सुशांतसिंग (Sushant singh) प्रकरणावरून महाराष्ट्र आणि बिहार यांच्या संबंधाबाबत वादंग सुरू असतानाच भाजपचे प्रमुख नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांना पक्षातर्फे बिहार निवडणुक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागताच भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड बरोबर निवडणूक लढवतांना सर्वाधिक जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. यासाठी देशातील प्रमुख भाजप नेत्यांना बिहारमध्ये पाचारण केले जाणार आहे.

फडणवीस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासातील नेते आहेत. राज्य पातळीवर संघटन कौशल्य सिद्ध करून त्यांनी २०१४ आणि २०१९मध्ये पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आणले आहेत. अभ्यासु, मेहनती आणि जिद्दी असलेल्या फडणवीसांचे हिंदीवर प्रभुत्व आहे. दुसरी बाब म्हणजे ते तरुण नेत आहेत, ही त्यांची जमेची बाजू आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच केंद्रीय पातळीवर जबाबदारी मिळाल्याने पक्षाकडून भविष्यात त्यांचे केंद्रात पुनर्वसन करण्यासाठी ही चाचपणी आहे का असे आता भाजपच्याच वर्तुळात बोलण्यात येत आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतसिंग प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. यानंतर त्यांना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारीपद देण्यात आले आहे. यावर बोलताना माजी विरोधीपक्ष नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना हाच योगायोग असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी योगायोग या शब्दावर जोर देत सुशांत प्रकरणात भाजपच्या भुमिकेवरही टोला लगावला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com