“छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाला...”; भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

“छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाला...”; भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

मुंबई | Mumbai

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेने वादंग निर्माण झाले. राहुल गांधी यांच्या या भूमिकेविरोधात भाजपने राज्यभर आंदोलन केलं.

मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या आरोपांवर निशाणा साधताना राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे एका वृत्तवाहिनीवर बोलत होते, त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्याची माफीनामे लिहित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाच पत्रं लिहिली होती, असं म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

सुधांशू त्रिवेदींच्या या विधानामुळे भाजप टीकेचं धनी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र काँग्रेसनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींचा व्हिडीओ ट्विट करत सवाल केलाय.

"सकाळी राज्यपाल शिवछत्रपतींना जुन्या काळातले आदर्श म्हणून भाजपच्या नेत्याला नव्या काळातील आदर्श ठरवतात आणि दुसरीकडे भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता शिवछत्रपतींनी औरंगजेबाची माफी मागितली असे थेट वक्तव्य करतो. सावरकरांचा माफीनामा लपवायला भाजपचे बगलबच्चे अजून किती खालच्या पातळीला जाणार?", असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलाय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंबधीचा व्हिडीओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं बोलणारा भाजपा प्रवक्ता वेडाच असू शकतो.”

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com