Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजप नेत्यांची जोरदार टीका

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजप नेत्यांची जोरदार टीका

मुंबई | Mumbai

ठाकरे सरकारला एक वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीवर भाजपा नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

- Advertisement -

तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले – आशिष शेलार

“परावलंबी वर्ष! तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले. कोणतीही कणखर भूमिका नाही. ठोस निर्णय नाही. शेतकरी, कामगार, श्रमिक, बलुतेदार, छोटे उद्योग यांना कसलीही मदत केली नाही. खंबीर आधार नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे नेतृत्व दिसले!,” अशी शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

“शाळा, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण सगळ्याबाबतीत संभ्रम.. कापूस, धान खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही, याची हमी नाही. अहो, जिथे गणपतीची उंची, लोकल ट्रेनचा निर्णय सुद्धा होऊ शकत नाही. तिथे वर्षपूर्तीचे कसले “अभिनंदन” आणि कसल्या मुलाखती!,” असं म्हणत शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राला ड्रायव्हर नकोय तर चांगला मुख्यमंत्री हवा – नारायण राणे

मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकले आहेत. ते कार चालवतात याचं संजय राऊत कौतुक करत आहेत. मात्र महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा आहे अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. हे सरकार तीन पक्षांचं सरकार आहे. जनतेशी गद्दारी करुन आलेलं हे सरकार आहे हे सरकार फार काळ टीकणार नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही नारायण राणेंनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने नव्हते, त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षणाला समर्थन दिलेलं नाही. सुप्रीम कोर्टात चांगले वकील नेमण्याची गरज आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या सरकारने ६५ हजार कोटींचं कर्ज मागील सहा महिन्यात काढून ठेवलं आणि राज्य दिवाळखोरीत नेलं असाही आरोप नारायण राणे यांनी केला. हात धुवून मागे लागेन अशी धमकी त्यांनी दिली आहे ती नेमकी कशाच्या जीवावर दिली आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्ध्वस्त करणाऱ्या मार्गावर जाऊ नये विकासाच्या मार्गावर जावं असाही सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे.

चंगू मंगूच्या फालतू गप्पा – निलेश राणे

निलेश राणे यांनी मुलाखतीवर टीका करत म्हंटले आहे की, या मुलाखतीतून आणि व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही अशा फुकट्या लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगू च्या फालतू गप्पा.”

मुलाखतीत काय म्हणाले होते ठाकरे?

ईडी वगैरेचा गैरवापर करुन दबाव आणत असाल तर याद राखा. मुलाबाळांच्या मागे लागून विकृत आनंद मिळवणाऱ्यांनो तुम्हालाही कुटुंब आहेत. मुलंबाळ आहेत हे विसरु नका. पण आमच्यावर संस्कार आहेत म्हणून संयम ठेवला आहे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला दिलेल्या मुलाखत दिला.

शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी वर्षा ते मातोश्री, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समन्वय, विरोधकांचे आरोप, सरकार चालवतानाची कसरत यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी ही मुलाखत घेतली आहे.

ते म्हणाले, सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही. तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो. सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा सूड काढू’ असा भाजपला थेट इशाराच ठाकरे यांनी दिला आहे.

‘मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. नक्कीच नाही. एक संस्कृती आहे. हिंदुत्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे आणि तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या