भाजप म्हणजे गटा-तटात असलेला पक्ष

भाजप म्हणजे गटा-तटात असलेला पक्ष

श्रेय घेण्याचे राजकारण बंद करावे - शिवसेना

जळगाव - Jalgaon :

गटा-तटात असलेला पक्ष म्हणजे भाजप असून, भाजप सारखी शिवसेनेला नौटंकी जमत नाही. त्यामुळे भाजपने आता, विकास कामांबाबत श्रेय न घेता, लोकांची दिशाभुल करण्याचा खेळ थांबवावा असे म्हणत मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सुनील महाजन, बंटी जोशी, प्रशांत नाईक यांनी संयुक्तिकरित्या आरोपाचे खंडण केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर भाजपने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले . या आरोपाचे खंडण करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या १६ व्या मजल्यावरील दालनात पत्रकार परिषद झाली.

यावेळी बंटी जोशी म्हणाले की, भाजप कायम श्रेय घेण्याच्या प्रयत्नात असतात, ते कायम जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतात, मनपाच्या हुडको कर्जमुक्ती केल्याचे तुणतुणे वाजवतात.

मात्र कर्जमुक्ती झाली असेलतर मग, मनपा तीन कोटी रुपयांचा हप्ता का भरत आहे? असा सवाल बंटी जोशी यांनी उपस्थित केला.

भाजपने अडीच वर्षात जळगावची वाताहत केल्याचा आरोप करत, श्रेय घेण्याचे राजकारण बंद करावे. अशा शब्दात जोशी यांनी भाजपचा समाचार घेतला. मनपात अडीच वर्ष भाजपची सत्ता असतांना काहीच करु शकले नाही.

तसेच आमदार गिरीष महाजन हे पालकमंत्री असतांना निधी का आणला नाही. असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेस शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक गणेश सोनवणे, निलेश पाटील, नितीन सपके, जाकीर पठाण उपस्थित होते.

शिवसेनेला भाजपसारखी नौटंकी जमत नाही

शहराच्या विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ६१ कोटींचा निधी दिला. तरीदेखील भाजपला टीका सुचते. यावरुन भाजपचे खुजेपण लक्षात येत असून, शिवसेनेला भाजप सारखी नौटंकी जमत नसल्याची टीका नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली.

जळगावकरांना विकासाची अपेक्षा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केलेेले आरोप तथ्यहिन आहे. पालकमंत्र्यांनी अनेक कामे केलेली आहेत. गटा-तटात वागत असलेला भाजप कधीच टीमवर्क म्हणून कामे करु शकत नाही. असा टोला सुनील महाजन यांनी लगावला. डिपीडीसीतून मिळालेल्या ६१ कोटींमधून लवकरच कामांना सुरुवात होईल.

.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com