
मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केवळ भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरून कानपिचक्याही दिल्या. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही दिला. यावरुनच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना ५० वेळेला काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भोगले. भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरेंमध्ये जर धमक असेल तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे. धमक असेल तर काँग्रेसची साथ सोडण्याचे जाहीर करा. उद्या जाहीर करा. नुसतं तोंडाच्या वाफा काढू नका, असे आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरेंना दिले आहे.
ज्या उद्धव ठाकरे कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाही. मागच्या दारावरून विधानपरिषदेत गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात. ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही. त्यांनी निवडणूकीच्या गप्पा मारू नये. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील २०० जागा जिंकून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बावनकुळेंनी आपल्या ५२ कुळा जरी खाली आणल्या तरी देखील शिवसेना आणि ठाकरे ते वेगळे करू शकणार नाहीत, अशी टीका मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या टीकेलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात. आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचे ज्या कुळाला उंची दिली होती. तो तुम्ही बुडविला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचा नाव बुडवत आहात. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा. काँग्रेस पक्षाची साथ सोडा. ते रोज सावरकरांचा अपमान करतात. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा आणि बाहेर पडा. फक्त सभेतूनच वल्गना करू नका, असे जोरदार प्रत्युत्तर बावनकुळेंनी उध्दव ठाकरेंना दिले आहे.
संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नौटंकी करत आहे. एकदा तुम्ही ठरवा आणि निर्णय घ्या. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तुम्ही काँग्रेस पक्षाकडे गेले. जर तुम्ही काँग्रेस पक्षाची साथ सोडली, तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचा अभिनंदन करेल. मी सुद्धा उद्धव ठाकरेंचा अभिनंदन करेल. संजय राऊत फुसकी फटाका आहे. त्यांच्या संदर्भात मी बोलणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.