'अजित पवार, जास्त गमजा करू नका!'; चंद्रकांत पाटलांनी बजावले

'अजित पवार, जास्त गमजा करू नका!'; चंद्रकांत पाटलांनी बजावले

'तुमचाही शॉर्टफॉम शोधतो'

मुंबई | Mumbai

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार तोफ डागली आहे. जास्त गमजा करू नका, अन्यथा तुमच्याही नावाचा शॉर्टफॉर्म शोधतो, असा सज्जड इशाराच त्यांनी दिला आहे. राज्यात सत्ताबदल नक्की कधी होणार हे अजित पवारांना माहिती आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

पंढरपूर-मंगळवेढ्याच्या निवडणूकीवरून हा कलगीतुरा रंगला आहे. अजित पवारांना काय झालं आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, असा टोला यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना लगावला.

यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री. उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतील. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांवरच एम फील करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र नेहमी फिरत असतं. माणसाने नेहमी नम्र राहायचं असतं. नीट बोलायचं असतं. सरकार पडणार नसेल तर इतका आकांडतांडव कशासाठी? एखाद्याला आजार झाला नसेल तर त्यांना आजार झाला नाही म्हणण्याचं कारण नाही. तुम्हाला ते पडणार आहे याची जाणीव आहे. कधी आणि कसं पडणार याची तुम्हाला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही खोटा आव आणता. जेव्हा सरकार पडेल तेव्हा सर्व टाइमटेबल माहिती होतं असं मान्य कराल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवारांना यावेळी इशारा देताना ते म्हणाले की, खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्ट फॉर्म आहेतत्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्ट फॉर्म मला करावी लागतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com