भाजप-राष्ट्रवादी होर्डिंगवरून आमने-सामने

भाजपच्या 'विकासपुरुष' होर्डिंगला राष्ट्रवादीच्या ‘कारभारी लयभारी’ने उत्तर
भाजप-राष्ट्रवादी होर्डिंगवरून आमने-सामने

पुणे (प्रतिनिधि) / Pune - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उद्या (दि. 22 जुलै ) एकाच दिवशी असल्याने पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होर्डिंग वॉर रंगले आहे.

२२ जुलै रोजी अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असतो. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून त्यानिमित्ताने होर्डिंग लावण्यात आले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वर्ष लक्षात घेता, देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग भाजपकडून लावले गेले आहेत, आता राष्ट्रवादी काँग्रेसने या होर्डिंग्जला ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिले आहे. सध्या शहरभर या पोस्टर वॉरची चर्चा रंगली आहे.

मागील तीन चार दिवसांपासून पुणे शहरात भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरभर विकासपुरुष या मथळ्याखाली फ्लेक्स लावले जात आहेत. या फ्लेक्सबाजीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला सुनावले. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना तोंडही फुटले. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून २२ जुलै रोजी अजित पवार यांचा देखील वाढदिवस असल्यामुळे भाजपच्या फ्लेक्सबाजीला ‘कारभारी लयभारी’ने उत्तर देण्यात आले आहे.

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी दोन्ही पक्षांनी होर्डिंग लावले आहेत. शहरातील राजकीय वर्तुळात या होर्डिंगची चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजप-राष्ट्रवादी होर्डिंगवरून आमने-सामने आल्यामुळे हा महापालिका निवडणुकीपूर्वीचा ट्रेलर तर नाही ना? अशी चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीतदेखील असाच राजकीय धुरळा उडण्याची चिन्ह यानिमित्ताने दिसत आहे.

अजित पवार भडकले

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलक, बॅनर लावण्यात येऊ नयेत. बॅनर, जाहिराती केल्याचे दिसल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे भाजपाकडून एका निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधी करोना नियंत्रणासाठी द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मात्र तरीही शहरात होर्डिंग लावण्यात आले आहेत. यावर माध्यमांनी प्रश्न विचारले असता अजित पवार भडकले.

गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का? आम्ही आमच्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केलं आहे. जर कोणी काही केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी घालण्यात आलेली नाही. मी पिपंरी चिंचवडमध्ये आज आलेलो नाही. माझी मतं पिपंरी चिंचवडकरांना स्पष्ट माहित आहेत. तुम्ही काहीतरी नविन मुद्दा काढण्यासाठी प्रश्न काढायचा हे धंदे बंद करा. अनिधकृत होर्डिंग लावावं हे मी सांगितलं नाही. मी फार नियमांच पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग जर चूकीची लागली असतील तर भाजपाची इथे सत्ता आहे. तिथल्या आयुक्तांनी आणि महापौरांनी कारवाई करावी” असे अजित पवार म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com