उदयनराजेंनी का घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट?; जाणून घ्या

उदयनराजेंनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत घेतली होती भेट
उदयनराजेंनी का घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट?; जाणून घ्या

मुंबई l Mumbai

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली असून दोघांत सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी उदयनराजेंनी भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत मराठा आरक्षणाप्रश्नी एक निवेदन दिलं आहे.

उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'राज्य सरकारने मराठा आरक्षणाप्रकरणी दोन अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. त्यातील एका अर्जात सर्व राज्य सरकारना प्रतिवादी करण्याची विनंती केली आहे. तर, दुसऱ्या अर्जात ११ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. जर अशा पद्धतीने खटल्यांचे कामकाज सुरु राहिले तर इतर खटल्यांप्रमाणे ही केसपण प्रलंबित राहील.' तसेच 'केस प्रलंबित राहिल्यास मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण होईल. आजही समाजात या दिरंगाईची खदखद वेगवेगळ्या रुपाने बाहेर येताना दिसत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात तुम्ही स्वतः लक्ष घालावे. तसेच, मराठा आरक्षणाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करु नये. तशा सूचना राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा', अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावर वेधले लक्ष

१. एसईबीसी उमेदवाराने ईडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारले तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार का?

२. जर मोठ्या प्रमाणावर ईडब्ल्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याचा केसवर परिणाम होणार का?

३. जर ईडब्ल्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवलं तर त्याचा मराठा उमेदवारांवर काही परिणाम होईल का?

४. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालायातील प्रलंबित खटल्यांसंबंधी जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन या खटल्यात सरकारकडून वकिलांना काय निर्देश देण्यात आले याचा खुलासा होईल.

५. एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या २१५० उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करुन त्यांना नोकरीत का सामावून घेत नाहीत?

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. मराठा आरक्षणला स्थगिती मिळाल्यामुळे राज्य सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू नीट मांडत नसल्याचे उदयनराजे यांचे म्हणणे होते. त्यामुळे शरद पवार यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून राज्य सरकारला सूचना द्यावा. तसंच महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार असून त्यांनीच या मुद्द्यावर देखील तोडगा काढवा असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते.

९ सप्टेंबर २०२० दिवशी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर वारंवार प्रलंबित झालेल्या सुनावणीला ८ मार्च पासून सुरुवात होणार आहे. ही सुनावणी तब्बल १० दिवस चालणार असून ८, ९, १० मार्च २०२१ रोजी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकण्यात येणार आहे. तर १२, १५, १६ मार्च २०२१ या दिवशी राज्य सरकार बाजू मांडणार आहे. १७ मार्च दिवशी मध्यस्थी बाजू मांडणार असून १८ मार्च रोजी केंद्र सरकारची बाजू ऐकली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com