भाजप खासदारांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने
राजकीय

भाजप खासदारांच्या घरासमोर युवक काँग्रेसची निदर्शने

खा. विखे यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना विचारला जाब

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर आणि जिल्हा युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांच्या शहरातील निवासस्थानासमोर निदर्शने करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत ‘कहा गये वो बिस लाख करोड’ ? याबाबत विचारणा केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी शहर युवक काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, कर्जत-पारनेर युवक काँग्रेस समन्वयक स्मितल वाबळे, जामखेड-श्रीगोंदा समन्वयक राहुल उगले, श्रीरामपूर-राहाता समन्वयक राजू बोरुडे आदी या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते. प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आणि आदेशावरून नगरसह सबंध राज्यभर हे आंदोलन करण्यात आले.

निदर्शनाच्यावेळी युवक काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पाटोळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा केल्या. निवडणुकीच्यावेळी देखील मोठी आश्वासने देशातील जनतेला दिली. वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. परंतु वीस लाख कोटी पैकी 20 हजार रुपये देखील सामान्य नागरिकांना मिळाले नाहीत.

दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खा. डॉ. विखे यांच्या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदींना विचारतो ते वीस लाख कोटी कुठे गेले याचे उत्तर द्या असा जाब यावेळी पाटोळे यांनी केंद्र सरकारला विचारला. स्मितल वाबळे, राहुल उगले, राजू बोरुडे यांचे मनोगत यावेळी झाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com