Video : लॉकडाऊन निषेधार्थ उदयनराजेंचं ‘भीक मागो' आंदोलन

राज्य सरकारने राज्यभरात विकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत
Video : लॉकडाऊन निषेधार्थ उदयनराजेंचं ‘भीक मागो' आंदोलन

सातारा | Satara

राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरात विकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत.

राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनविरोधात भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विरोध केला. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर 'भीक मांगो' आंदोलन केले.

यावेळी विविध विषयावरून उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला. राज्यातील गोरगरीब जनतेचे मोठे हाल सुरु आहेत. छोटे व्यापारी, व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. अशावेळी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केल्यानं ते देशोधडीला लागतील,असं मत उदयनराजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही.व्यवसायच झाला नाही तर व्यापारी वर्ग कामगारांचा पगार कसा देणार? असा सवाल उदयनराजेंनी बोलतांना उपस्थित केला.

तसेच,सणासुदीचे दिवस असल्यानं व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला.आता दुकानंच बंद ठेवली तर व्यवसाय कसा होणार? व्यापारी बँकांचे हप्ते कसे भरणार?लॉकडाऊनमुळे लोकांना उपाशी मारण्यापेक्षा कामगारांचं लसीकरण करा,अशी मागणी करत लॉकडाऊन होणार नाही,व्यापारी दुकानं उघडतीलच,असा जाहिर इशारा देखील उदनयराजेंनी ठाकरे सरकारला दिला आहे.

या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. भीक मागो आंदोलन करत जमा केलेले ४५० रुपये घेऊन उदयनराजे यांनी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ती रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे जमा केली. गोरगरीब जनतेच्या पाठीशी मी कायम उभा राहणार असून राज्य शासनाने वीकेंड लॉकडाऊनचा पूनर्विचार करावा, असेही उदयनराजेंनी शेवटी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com